दारूच्या दुष्टचक्रातून सुटका ….

माझं नाव राहुल, मी एक दारूडा आहे. केवळ परमेश्वराची आणि अल्कोहोल्किस् अ‍ॅनानिमसची कृपा, याचबरोबर माझ्या ए.ए.बांधवांची व माझ्या प्रेमळ पत्नीची मदत आणि सहकार्य याचमुळे आज मी विषारी दारूच्या घातक घोटापासुन आनंदाने दूर आहे.

खुप सुंदर जीवन, अतिशय चांगल्या कुटुंबातील मोठा मुलगा, सर्व कुटुंबियांच्या आशा माझ्यावर होत्या. हा भविष्यात घराण्याचे नाव काढणार, कोणीतरी मोठा माणूस होणार असे सर्वांना माझ्या लहानपणापासुन वाटत होते. त्याप्रमाणेच माझी वाटचाल ही सुरू होती. वयाच्या अठराव्या वर्षीच नोकरी लागली व हातात पैसा येऊ लागला. घरी पैसे देण्याची गरज नव्हती, हाती गाडी आली. आयुष्यात प्रचंड आनंद उपभोगायचा, सर्वसामान्यांसारखे जीवन आपले नाहीच, आपण काहीतरी वेगळे आहोत, अशी समजूत झाली. मला आवडणारी मुलगी माझ्या गाडीवर बसून फिरू लागली. मग तर खुपच वेगळे वाटू लागले. आयुष्याचा सिनेमा झालाय असे वाटू लागले. पळून जाऊन लग्न केले व मला आपण हिरो असल्याचा खोटा आभास होऊ लागला.

अतिशय सावकाश, मजेसाठी जीवनात दारूने प्रवेश केला आणि दारू म्हणजे मजा, आनंद जल्लोष असा ठसा माझ्या मनावर उमटला, प्रचंड मजा येऊ लागली. दारू खुप मोठी-मोठी स्वप्ने दाखवू लागली. नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला व त्यातही जम बसला. मग मात्र, जग जिंकल्याचा आनंद होवू लागला. छान मुलगा झाला. सर्व घरातील मंडळी सुखी व मजेत होती. पण माझी दारू हळूहळू रोज रात्री होऊ लागली, वाढू लागली. आता मला रोज दारू पिण्यासाठी बायकोला कारणे द्यावी लागू लागली. रोज घरी यायला उशीर होवू लागला. बायकोची राजची कटकट चालू झाली. दुकानात लक्ष लागेनासे झाले. रात्र कधी होते व मी बार कधी गाठतो याची ओढ लागायला लागली. दारू ही माझ्या जीवनाची समस्या झाली या अविवेकी दारूपायी वारंवार पैशाची चणचण व त्यामुळे बायकोशी रोजची भांडणे व मारहाण यामुळे संसार रोज मोडू लागला, असे का झाले? का होत आहे? व मला दारू एवढी का प्यावी लागत आहे? हे कळेनासे झाले. दारू पिण्यासाठी घरात चोऱ्या सुरू झाल्या. व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आला व माझ्या वागण्याने, बायकोला नोकरी करावी लागणार हे उघड झाले. त्या हताश परिस्थितीत खुप दारू पिऊ लागलो. एकटाच घरात बसून रहायचो. मुलावर माझ्या या वागण्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याला माझ्या आईवडिलांकडे ठेवले.

पैसे अपुरे पडू लागल्यामुळे दारूचा दर्जा घसरला. घरातील सर्व हरले होते, बायकोने आशा सोडली होती. व मी मृत्यूची वाट बघू लागलो होतो. एका चांगल्या मुलाचा दारूने राक्षस केला होता. त्या दारूच्या नशेत बायकोच्या चारित्र्यावर संशय घेवू लागलो. बायकोवर नाही-नाही ते आरोप करू लागलो. नराधमासारखा वागू लागलो, वेड लागल्यासारखा बडबडू लागलो. मग मात्र, बायको घाबरली, घरचे हादरले व माझ्या दारू सोडविण्याचे प्रयोग सुरू झाले. सतत व्यसनमुक्ती केंद्राच्या फेऱ्या सुरू झाल्या. पण मी दारू थांबवायला तयार नव्हतो. भांडणे, मारामाऱ्या, पालिस केस, कोर्ट कचेरी सुरू झाली. पोलीसांचा मारपण सुटेना, बायको सोडून गेली व मी आईवडिलांकडे लाचार जीवन जगू लागलो. दारू प्यालो तर घराबाहेर रहावे लागेल व व्यसनमुक्ती केंद्रातूनही हाकलून देण्यात आले होते. म्हणून दारू पित नव्हतो. पण मनात प्रचंड राग होता. माझेही दिवस येतील, मग या सर्वांना बघून घेतो, अशा प्रकारचे विचार करीत जगत होतो व एक दिवस छान नोकरी लागली. सर्व काही व्यवस्थित होणार, असे वाटू लागले. बायकोकडे तिच्या घरी जाऊ लागलो व माफी मागण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तिने लाथाडले व सर्व राग एक दिवस उफाळून बाहेर पडला. तो दिवस आजही माझ्या नजरेसमोरून जात नाही. मी तिच्याकडे गेलो व पुन्हा अपमानित होवून दुखावलो व दारू प्यायलो ते मनात राग घेवूनच. आता तिला मारूनच टाकायचे या बेतानेच गेलो. तिला प्रचंड मारहाण केली. माझ्यातील माणूसच हरवला होता. सैतानाने जागा घेतली व तिसऱ्या मजल्यावरून तिला ढकलणार इतक्यात शेजारच्या एक देवतासमान स्त्रिने ओरडून मला थांबवले व त्याक्षणी माझ्यात काय बदल झाल की सांगू शकत नाही. परंतु काही तरी चमत्कार झाला. बायकोच्या नजरेत मरणाची भिती मूर्तिमंत उभी होती. मी शांत झालो. परंतु तेथील लोकांनी मला इतके मारले की, मी काही प्रतिकार करू शकलो नाही. मला माझ्या बायकोने पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात टाकले.

व्यसनमुक्ती केंद्रात मला अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेचे नाव सतत कानावर येत होते. त्याच ए.ए.त जायचे हे मनापासून ठरविले व व्यसनमुक्ती केंद्रातून आल्यावर सातत्याने ए.ए.च्या मिटींग करू लागलो. एकेकाचे अनुभव ऐकु लागलो. मद्यपाश एक आजार आहे आणि मी या आजारला बळी पडलो आहे, हे मला समजले. छान छोटी नोकरी मिळाली. गेले २४ महिने घर, नोकरी व मिटींग हे तंत्र वापरतो आहे. गेलेला आत्मविश्वास केवळ मिटींगमुळे परत मिळाला. गेलेले परत कधीच मिळणार नाही. पण आज जे माझ्याकडे शिल्लक आहे, ते ए.ए.च्या मिटींगला आलो तर नक्कीच जाणार नाही, ही शाश्वती आहे, म्हणूनच मी सातत्याने माझ्या जीवात-जीव असेपर्यंत मला स्वत:ला दारूपासुन दूर ठेवण्यासाठी व नवीन येणाऱ्या सभासदांना माझ्या अनुभवांतुन ताकद देण्यासाठी ए.ए.च्या मिटींगला येत राहणार आहे.

 

राहुल

 

Back