माझे नाव अमोल, मी एक दारूडा आहे. केवळ परमेश्वराच्या आणि अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस(ए.ए.)च्या कृपेमुळे दारूपासून दूर आहे. वयाच्या १७व्या वर्षी माझ्या तोंडास दारू लागली. नंतर १७ ते ४२ वर्षांपर्यंत म्हणजे २५ वर्षे माझ्या आयुष्यात दारू होती आणि त्याचा परिणाम सर्व ठिकाणी होत होता.
मी त्यावेळेस सुरूवातीला साधा गरीब स्वभावाचा निरूपद्रवी असा तरुण होतो. कोणत्याही गोष्टीचा दहा वेळा विचार करायचो. मी स्वत:चा धंदा चालू केला. धंदा चालू असताना मधुन-मधुन दारू माझ्या हातात येत होती. परंतु माझे धंद्याकडे पूर्ण लक्ष होते. त्यामुळे धंदा खुप भरभराटीला आला. सतत हातात पैसा खेळत होता. दारू वाढायला लागली, दारू पोटात असल्यावर मी माझ्याकडे कामास असलेल्या माणसांना वाटेल अशा शिव्या देऊन, त्यांच्याकडून काम करून घेत असे. काही दिवसांनी मी दारू जवळ-जवळ रोजच प्यायला लागलो. घरातील आई व बायको यांची तशी माझ्या दारूबद्दल जास्त तक्रार नव्हती. याच काळात माझी मेव्हणी व सासूपण आमच्यासोबत रहात होती. मी भाड्याच्या घरात राहत असे. स्वत:चे घर घ्यावे असे त्यावेळेस कधीच वाटले नाही. दारूसाठी रोज दोनशे ते अडीचशे रूपये खर्च होत होते. एकदा माझी बायको मला म्हणाली, “आपण चांगले घर घेऊया, त्या वेळेस मी प्यालेलो होतो.” मी लगेच माझ्या बचत खात्यातील दहा हजार रूपये काढले व फ्लॅट बुक केला. घरी येऊन बायकोस व आईस सांगितले की, फ्लॅट घेतला. पुढे फ्लॅटसाठी आणखी पैसे भरायचे आहे, याचा साधा विचारपण माझ्या डोक्यात आला नाही. तीन महिन्यानंतर माझ्या मित्राचा, पैशांकरिता निरोप आला, मी कानाडोळा केला. सहा महिने निघून गेले. परत निरोप आला. परंतु ह्यावेळेस मित्राने सांगितले, “पुढील पैसे भरायचे नसल्यास, माझ्याकडे दुसरे गिऱ्हाईक तयार आहेत. तुम्ही तुमचे पैसे परत घेऊन जा !” दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक क्वॉर्टर दारू घेतली व माझ्या त्या मित्राकडे गेलो. त्यांनी मला दोन हजार कापून आठ हजार रूपये दिले व फ्लॅट दुसऱ्या गिऱ्हाईकाला देऊन टाकला. ते पैसे घेऊन मी बारमध्ये दारू प्यालो. व घरी येऊन बायको व आई यांना अगदी व्यवस्थित समजाऊन सांगितले कि, फ्लॅटचे दरवाजे नेहमी बंद असतात, कोणीही खून, चोरी वगैरे करतात.
यानंतर माझ्या वयाच्या ४५ ते ४७ वर्ष हा कालखंड सुरू झाला या वर्षामध्ये माझे, माझ्या कामावरचे लक्ष कमी झाले होते. त्यामुळे पैश्यांची चणचण सुरू झाली. खोटे बोलून एक-एक वस्तू विकायला सुरूवात केली. पिणे सकाळ-दुपार-संध्याकाळ चालू होते. शरीर कमजोर होऊ लागले होते. सुरूवातीच्या काळात मी होमगार्डचा कमांडर होतो. ते पण सोडून दिले. मला भास व्हावयास लागले होते. पिऊन आल्यावर मी रात्री वाटेल तशी बडबड करीत असे. रात्री उठून एकटाच होमगार्डची परेड करीत असे. जे मी २५ वर्षांत कमविले, ते पाच वर्षात एक-एक करून विकून त्याची दारू प्यालो. आई, बायको, मुले, नातेवाईक, सर्वजण मला कंटाळले होते. माझी दारु सुटण्यासाठी ते सर्व प्रकारचे उपाय करीत असत. परंतु फरक पडत नसे. माझे पिणे उलट वाढतच चालले. चांगले मित्र पण मला टाळायला लागले होते. नातेवाईकांनी येणे बंद केले होते. दारूमुळे तीन-चार वेळा दवाखान्यात जावे लागले होते.
अे.अे. सभासद १९८३ साली फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्याकडे आला. त्याने अे.अे. ची माहिती मला सांगितली, परंतु मला खूप घमेंड होती, मी दारूड्या नाही; असे त्यास सांगितले. काही दिवसानंतर परत तोच अे.अे. सभासद मला रस्त्यातच भेटला व हाक मारली. त्याने माझे पास-बुक पाहिले. “वरती किती पैसे होते ते पहा व आता कमी होत होत किती राहिले आहेत ते पहा. ते रहावे अश इच्छा असल्यास अे.अे. च्या मिटींला ये, पैसे जावेत अशी इच्छा असेल तर खुशाल दारू पित बस, आमचे काहीही म्हणणे नाही.” घरी येऊन विचार केला. अे.अे. सभेस जाण्याचा विचार मनात आला आणि पत्नीसोबत अे.अे. च्या सभेला गेलो.
सातत्त्याने अे.अे. च्या सभेस हजर राहू लागल्यामुळे नवीन गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या. मी २३ जून १९८४ पासुन मद्यमुक्त झालो. नवजीवनाचे पर्व सुरू झाले. नवीन आशा, नवीन हिंमत, धैर्य व नवीन नि:स्वार्थी मित्र मला मिळाले. प्रथम मी माझ्या शरीरवर लक्ष द्यावयास सुरूवात केली. जी पूरक व्यसने मला होती; ती हळूहळू बंद केली. जुगार बंद केला, सिगरेट बंदी केली, तंबाखू खाणे बंद केले, पान बंद झाले, भाड्याच्या घरातून नविन फ्लॅटमध्ये रहावयास गेलो. फ्लॅटचे हप्ते फेडले. मुख्य म्हणजे मी मानसिक समाधान भरभरून उपभोगतो आहे. कौटुंबिक परिस्थितीत पण खूप मोठा बदल झाला आहे. कुटुंबामध्ये अे.अे. त आल्यावर चांगले-वाईट प्रसंग येतात. त्याचा अनुभव मी पुरेपूर घेतला. अशा प्रसंगांना सामोरे जाण्याची हिंमत, ताकद मला परमेश्वराने दिली. त्या परमेश्वराचा मी सदैव ऋणी आहे व ऋणी राहीन.
अमोल
पुणे
——————-
सूचना
आपल्याला जर आपुला अनुभव अमुच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावयाची इच्छा असल्यास आपण आपुला लिखित अनुभव आम्हाला इमेल द्वारे [webmaster@aawmig.org] अथवा व्यतिशरित्या अे.अे. पशिम मुंबई अंतर समूह कार्यालयात पोचता करावा.
अे.अे. सभासद आपुला अनुभव मराठी, हिंदी अथवा ईंग्रजी भाषेत अमुच्या संकेतस्थळावर प्रकाशित करू शकतात.